डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर ह्यांचा ज्ञानकोश हा 23 खंडांचा मराठीतील पहिला ज्ञानकोश आहे. हा ज्ञानकोश डिजिटल स्वरूपात आंतरजालावर उपलब्ध करून दिल्याबद्दल (https://ketkardnyankosh.in/) यशवंतराव चव्हाण सेंटरचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. ह्याप्रमाणेच इतिहास, समाजशास्त्र आणि भाषाविज्ञान अशा अनेक क्षेत्रांमधील व्यासंग आणि संशोधन करणारे विश्वनाथ काशीनाथ राजवाडे ह्यांचे समग्र साहित्यही (https://samagrarajwade.com/) यशवंतराव चव्हाण सेंटरने आंतरजालावर उपलब्ध करून दिले आहे.
सध्या लोकसत्ता दैनिकात दररोज राजवाडे विचारविश्व ह्या शीर्षकाखाली वि.का.राजवाडे ह्यांच्या साहित्याबद्दल आणि कार्याबद्दल श्री. आनंद हर्डीकर लिहीत आहेत. ते वाचताना संदर्भासाठी https://samagrarajwade.com हे स्थळ उपयुक्त ठरेल. राजवाडे ह्यांनी संशोधित केलेली मोडी लिपीतील किंवा फार्सी भाषेतील मूळ कागदपत्रे पाहायची असतील तर यशवंतराव चव्हाण सेंटर आणि इ.वि.का.राजवाडे संशोधन मंडळ, धुळे ह्यांच्या संयुक्त विद्यमाने https://vkrajwade.com/ हे स्थळ उपलब्ध आहे.
मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाने राजवाडे यांनी संपादित केलेल्या आणि इतर संशोधकांनी प्रमाणित केलेल्या पाठांचा अभ्यास करून ज्ञानेश्वरीचे खंड (उदा. राजवाडे संहिता, खंड १ आणि खंड २) प्रकाशित केले आहेत. या ग्रंथांमध्ये मूळ ओव्या, अन्वयार्थ, कठीण शब्दांचे अर्थ आणि नाथपंथी टीपा यांचा समावेश करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या व राजवाडे यांनी संपादित केलेल्या प्रतींच्या डिजिटल प्रतिमा https://archive.org/details/20220709_20220709_1407 येथे (Internet Archive वर) अभ्यासासाठी उपलब्ध आहेत.
संशोधनाचा असा प्रचंड आवाका असलेल्या राजवाड्यांनी आपले लेखन हट्टाने मराठीमध्ये केले. आपले काम इतके महत्त्वाचे आहे की ते जाणून घेण्यासाठी परभाषी संशोधकांना मराठी शिकावे लागेल आणि ते मराठी शिकतील असा आत्मविश्वास त्यांना होता.
साने गुरुजींनी लिहिलेले वि.का.राजवाडे ह्यांचे (46 पानी) चरित्र (https://samagrarajwade.com/rajwade-articles) एका बैठकीत वाचून होण्यासारखे आहे.
No comments:
Post a Comment