StatCounter

Thursday, 25 June 2026

शतौक्वा

शतौक्वा (Chautauqua) हा शब्द प्रथमतः मला रॉबर्ट पर्सिगच्या Zen and the Art of Motorcycle Maintenance या पुस्तकात ''भेटला.'' शतौक्वा ह्या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. कथनाच्या प्रवाहात एखादे तत्त्वज्ञान गुंफून त्या मजकुराला रॉबर्ट पर्सिगने शतौक्वा हे नाव दिले आहे. मूळ चर्चा विषयाचा किंवा व्याख्यानाचा थोडा विस्तार करण्यासाठी ह्या परिच्छेदांची योजना लेखकाने केली आहे.

लांबच्या प्रवासात मोटर सायकलची डागडुजी करताना मुलाचे कुतूहल शमविण्याच्या निमित्ताने पर्सिग जीवनाची गुणवत्ता ह्या त्याच्या मूळ प्रतिपाद्य विषयाच्या अनुषंगाने विविध अंगांनी भाष्य करतो. 'कथनाच्या ओघात तत्त्वचर्चा' अशा शैलीचा अनुभव घेण्यासाठी हे पुस्तक वाचायला किंवा चाळायला हरकत नाही.

Saturday, 21 March 2026

दिसामाजी काहीतरी ते लिहावे

“दिसामाजी काहीतरी ते लिहावे” ही समर्थ रामदास यांची उक्ती आज पूर्वीपेक्षा अधिक अर्थवाही वाटते. मानवी उत्क्रांतीत आपली शेपटी गळून पडली, नखे-कातडी बदलली; पण आता आपली भाषा आणि हस्ताक्षर यांच्याच अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे का, अशी शंका मनात डोकावते. भाषण आणि लेखन हे भाषाव्यवहाराचे दोन मुख्य आधारस्तंभ. त्यापैकी लेखनाचा पाया हलू लागला, तर विचारांची उभारणी किती ठोस राहील?

आज पेन हातात घेण्यापेक्षा आपण स्क्रीनवर बोटे फिरवतो, कीबोर्डवर टाईप करतो. सोय, वेग आणि कार्यक्षमता या नावाखाली आपण हाताने लिहिण्याची सवय मागे टाकत आहोत. परंतु या प्रक्रियेत आपल्या बोधनकौशल्यांवर, ऐंद्रिय अनुभवांवर आणि इतिहासाशी जोडलेल्या नात्यावर परिणाम होत नाही ना, ही भीती रास्त आहे.

अमेरिकेत “ऑटोपेन” नावाचे एक साधन वापरले जाते. हे यंत्र एखाद्याची स्वाक्षरी स्मृतीत साठवून ठेवते आणि यांत्रिक हाताद्वारे तीच स्वाक्षरी आवश्यक त्या कागदपत्रांवर करते. अशा रीतीने सह्या ठोकणारा रोबोचा हात हे तंत्रज्ञानाच्या दृष्टीने कदाचित प्राथमिक पाऊल असेल; परंतु त्यातून निर्माण होणारे नैतिक आणि भावनिक प्रश्न मात्र गंभीर आहेत.

वीरमरण प्राप्त सैनिकांच्या कुटुंबियांना पाठवलेल्या सांत्वनपत्रांवर अशा यांत्रिक सह्या झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर अमेरिकेत चर्चा रंगली. स्वाक्षरी ही केवळ नावाची खूण नसते; ती व्यक्तीच्या उपस्थितीची, संवेदनांची साक्ष असते.

याच संदर्भात एक उदाहरण उल्लेखनीय आहे. प्रसिद्ध गायक Bob Dylan यांचे The Philosophy of Modern Song हे पुस्तक सुमारे 600 डॉलर्स किंमतीचे आहे. ह्या पुस्तकाच्या 'लेखकाने स्वाक्षरी केलेल्या' प्रती भरपूर विकल्या गेल्या. नंतर या सह्या ऑटोपेनद्वारे केल्या असल्याचे उघड झाल्यावर डायलन यांनी फेसबुक पेजवर दिलगिरी व्यक्त केली आणि आपली चूक लगेच दुरुस्त करण्याची इच्छा व्यक्त केली. वाचकांना केवळ सही नको होती; त्यांना लेखकाचा स्पर्श हवा होता.

हस्ताक्षर हा व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो. अक्षरांतील वळणे, दाब, वेग—या सर्वांतून मनःस्थिती, शिस्त, भावना प्रतिबिंबित होतात. संशोधकांना जुन्या हस्तलिखितांमधून लेखकाचा स्वभाव, त्याची निकड, त्याचा भावनावेग यांचे संकेत मिळतात. कॅलिग्राफी ही केवळ सजावट नसते; तो मानवी विविधतेचा एक कलात्मक आविष्कार असतो.

तथापि, हस्ताक्षर लुप्त होत चालले आहे. Finland ने 2016 पासून शालेय अभ्यासक्रमातून कर्सिव्ह लेखन वगळले; Switzerland नेही तत्सम पाऊल उचलले. परिणामी, अनेक विद्यार्थ्यांना कर्सिव्ह लिहिता तर येत नाहीच, पण ते वाचताही येत नाही. कर्सिव लेखन आता फक्त आजी-आजोबांपुरते उरले आहे. आपणही मोडी लिपी केव्हाच सोडली. बाळबोध देवनागरीत लिहिताना अक्षरांची तुटक रचना जणू ‘कॅपिटल लेटर्स’सारखी वाटते. आता तर बाळबोध लिपीही धोक्यात आली आहे, तर मोडीची काय कथा?

लेखनाविषयीचा हा अनुत्साह केवळ मुलांपुरता मर्यादित नाही. पालक वाचताना दिसतात; पण लिहिताना क्वचितच. त्यामुळे मुलांमध्ये लेखनाची प्रेरणा कमी होते. मित्रांना पत्र लिहिणे दूरच, वाणसामानाची यादीही व्हॉट्सअॅपवर पाठवली जाते. केकवर आयसिंगने शुभेच्छा संदेश लिहिणारे कारागीर दुर्मीळ होत आहेत. सेलिब्रिटींच्या सह्यांऐवजी आता सेल्फीचे युग आले आहे.

चीन आणि जपानसारख्या देशांत हस्ताक्षराला सांस्कृतिक व आध्यात्मिक महत्त्व आहे; तरीही तेथील तरुणाई डिजिटल माध्यमांकडे झुकताना दिसते. जागतिक पातळीवर लेखन ‘उपयुक्त कौशल्य’ म्हणूनच पाहिले जाऊ लागले आहे—कलात्मक, वैचारिक किंवा वैयक्तिक साधना म्हणून नव्हे.

शिक्षक आणि डॉक्टर यांसारख्या काही व्यावसायिकांमध्ये हाताने लिहिण्याची गरज अजूनही आहे. डॉक्टरांच्या गचाळ हस्ताक्षरावर विनोद केले जातात; पण त्याचे दुष्परिणाम गंभीर असू शकतात. Los Angeles येथील एका रुग्णालयाने 2000 साली डॉक्टरांसाठी हस्ताक्षर सुधारवर्ग घेतले होते. Texas मधील एका खटल्यात वाईट हस्ताक्षरामुळे चुकीचे औषध दिल्याचा आरोप मान्य होऊन मोठी नुकसानभरपाई देण्यात आली. आज अनेक वैद्यकीय नोंदी संगणकावर होतात; तरीही औषधाच्या चिठ्ठ्या हातानेच लिहिल्या जातात—वेळेच्या बचतीसाठी.

संशोधन असे दर्शवते की हाताने लिहिणे मेंदूला अधिक चालना देते. लॅपटॉपवर टिपणे घेताना विद्यार्थी शब्दशः नोंद करतात; पण संकल्पना समजून घेण्यात कमी पडतात. वहीत हाताने टिपणे काढताना लिहिण्याचा वेग कमी असल्याने विचारांची प्रक्रिया अधिक सखोल होते, लक्ष केंद्रित राहते आणि स्मरणशक्ती मजबूत होते. कीबोर्डवरील लेखन अधिक अमूर्त, दुरावा निर्माण करणारे ठरू शकते.

काही संशोधकांच्या मते, हाताने लिहिण्याची कला हरवणे हे जैवविविधतेच्या ऱ्हासाइतकेच गंभीर आहे. प्रजाती जशा नष्ट होतात, तशी कौशल्येही हरवतात. कार्यक्षमतेच्या नादात आपण मानवी स्पर्श, भावनिक गुंतवणूक आणि बौद्धिक सखोलता गमावत नाही ना, याचा विचार करणे आवश्यक आहे.

हस्ताक्षराशिवाय जगणे शक्य आहे; पण हस्ताक्षर टिकवणे अधिक अर्थपूर्ण आहे. रोज काही ओळी लिहिण्याची सवय लावणे अवघड नाही. हा लेख टाईप करण्यापूर्वी मी तो हाताने लिहून काढला—जाणीवपूर्वक. आपली क्षमता, आपली ओळख आणि आपला मानवी स्पर्श टिकवून ठेवण्याचा प्रयत्न आपल्या हातात आहे.

“दिसामाजी काहीतरी ते लिहावे” ही उक्ती केवळ साहित्यिक सल्ला नाही; ती मानवी अस्मितेचे जतन करण्याची आठवण आहे.

Monday, 27 November 2023

आजचा लोकसत्ता पेपर

आजचा लोकसत्ता बरा आहे. वाचायला बरे लेख आहेत. वित्त विभागातही बरे लेख आहेत. अग्रलेख तितकासा चांगला नाही.

Friday, 3 February 2023

रवींद्रायन

स्थळवर्णन आणि व्यक्तिचित्रण करण्यात हातखंडा असलेल्या रवींद्र पिंगे (1926-2008) ह्यांच्या पश्चात त्यांच्या मुलाने प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या संकीर्ण ललित लेखांचा रवीन्द्रायन हा संग्रह आहे.

पिंगे अर्थशास्त्राचे पदवीधर होते. त्यांचे बालपण मुंबईत गिरगावात गेले.  पिंगे कुटुंब मूळचे विजयदुर्गाच्या जवळ असलेल्या `उपळे’ ह्या गावचे. संग्रहातले उपळे आणि कोकणातील इतर गावांचे मनोज्ञ वर्णन करणारे लेख विशेष वाचनीय आहेत. 319-pinge-ravindra-ramchandra_1

 

 

लेखक आणि लेखनाविषयीचे ह्या पुस्तकातील लेख सुद्धा वाचकांना नक्की आवडतील. ‘'मजकूर आशयसंपन्न असावा, आविष्कारशैली प्रवाही असावी, मजकुराची कागदावरील मांडणी नेत्रसुखद असावी, पुस्तकाचा बोलबाला व्हावा, गुंतवलेलं धन विक्रीतून चालीचालीनं वसूल व्हावं…’’ अशा लेखकाच्या माफक अपेक्षा त्यांनी सांगितलेल्या आहेत.

व्यक्तिचित्रणांमध्ये, अभिजात लेखन करणार्या हेन्री डेव्हिड थोरो ते इंदिरा संत ह्यांच्यापर्यंतच्या प्रसिद्ध आणि धुरंधर लेखकांची व्यक्तिचित्रे आहेत. स्थळवर्णन ऐतिहासिक तसेच निसर्गरम्य स्थळांचे आहे.

कोकणातील निसर्गाचे आणि खाद्यपदार्थांच्या चवीचे वर्णन करताना पिंग्यांची लेखणी विशेष बहरते. ‘पापलेट, सरंगे, कोळंबी, सुरमई, बांगडे, कान्टा, बोयटं, कर्ली, कालवं’ अशी सागरी मासळी त्यांना साद घालते. तांबड्या झाकेचा भात, कुळथाची पिठी, पडवळाची, किंवा दोडक्याची किंवा पाल्याची भाजी आणि फोडणीचं ताक हे अन्नब्रह्म…’’b81dfae8589040f6ac9725825a5c7ca3

 

पिंगे यांनी मंत्रालयात पंधरा वर्षे नोकरी केल्यानंतर १९६५मध्ये ते आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात साहाय्यक निर्माता म्हणून रुजू झाले. त्यानंतर आकाशवाणीसाठी त्यांनी डझनावारी नाटिका लिहिल्या. ‘बकुल फुल’, ‘शतपावली’ (१९७४), ‘देवाघरचा पाऊस’ (१९७५), ‘दिवे लक्ष्मण दिवे’ (१९८४), ‘अत्तर आणि गुलाबपाणी’  (१९९६) हे लेखसंग्रह; ‘आनंदाच्या दाही दिशा’ (१९७४), ‘आनंदव्रत’ (१९८३), ‘दुसरी पौर्णिमा’ (१९९६) ही प्रवासवर्णने; ‘पश्चिमेचा पुत्र’ (१९७२), ‘पिंपळपान’ (१९८६), ‘हिरवीगार पानं’ (१९९२) ही पाश्‍चात्त्य साहित्याचा परिचय करून देणारी पुस्तके; ‘परशुरामाची सावली’ (१९७०) ही कादंबरी; ‘प्राजक्ताची फांदी’ (१९७८), व ‘सुखाचं फूल’ (१९८१) हे कथासंग्रह; असे विविध स्वरूपाचे लेखन पिंगे यांनी केले. विशेष म्हणजे त्यांचे सुमारे दोनशे ललितलेख ‘माणूस’ साप्ताहिकातून सतत पाच वर्षांच्या प्रसिद्ध कालावधीत झाले. ‘साहित्यसूची’चे ते लेखक आणि संपादकीय सल्लागार होते. ‘सर्वोत्तम रवींद्र पिंगे’, तीनशे भारतीयांची व्यक्तिचित्रे, पाश्चात्त्य साहित्यसेवकांचे दोनशे परिचय, शंभर प्रवासवर्णने, हजारो पुस्तक परीक्षणे, साठ मानपत्रे, पाच-सहाशे ललितलेख, पन्नास कथा आणि तितकेच अनुवाद ही पिंगे यांची लेखनसंपत्ती होय. पिंगे यांच्या लेखनाला वाचकांनी भरभरून प्रेम दिले, दाद दिली.(

https://maharashtranayak.in/paingae-ravaindara-raamacandara )

 

इतिशोध

पद्मगंधा प्रकाशनातर्फे सुमारे 25 वर्षांपूर्वी प्रकाशित करण्यात आलेले 'इतिशोध' हे इतिहास संशोधक सुरेश जोशी ह्यांचे 172 पानांचे पुस्तक नुकतेच वाचनात आले. लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांचे हे संकलन आहे.

पुस्तकाच्या प्रस्तावनेत श्री. निनाद बेडेकर म्हणतात, '' इतिशोध हे आत्मचरित्र नव्हे. ऐतिहासिक साधने गोळा करण्यासाठी केलेल्या कष्टमेहनतीची ती एक गाथा आहे, किंवा व्यथा आहे.'' शिलालेख, ताम्रपट, मूर्ती, चित्रे, नाणी, खापरे, कागदपत्रे अशीच इतिहास संशोधनाची साधने असतात. ऐतिहासिक साधने संगृहीत करून ठेवण्यास मिळालेली दृष्टी हे खरे तर ह्या मेहनतीमागचे भांडवल आहे.

श्री. सुरेश जोशी 40 वर्षे अहमदनगर ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाचे कार्यकारी विश्वस्त होते. पुण्यातील राजा केळकर वस्तुसंग्रहालयाचे क्युरेटर म्हणूनही काही काळ त्यांनी काम पाहिले आहे.

नगरच्या ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयातील दुर्मीळ, साधनांचा प्रचंड संग्रह त्यांच्या परिश्रमाची, चिकाटीची आणि जिद्दीची साक्ष आहे. हा बहुमोल संग्रह गोळा करताना अनेक व्यक्ती, समाज आणि प्रसंग ह्यांचा श्री. जोशी ह्यांच्या संवेदनशील मनाने घेतलेला शोध असे ह्या 'इतिशोधाचे' स्वरूप आहे.WhatsApp Image 2023-01-28 at 12.08.03

महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार ह्यांचा सहवास आणि मार्गदर्शन आणि त्यांच्याशी असलेला घरोबा ह्याविषयी जोशी ह्यांनी समरसून लिहिले आहे. सेतुमाधवराव पगडी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, डॉ. सांकलिया, डॉ. पु. म. जोशी, प्रा. राम शेवाळकर, न. र. फाटक, बाबासाहेब पुरंदरे, अशा अनेक दिग्गजांशी आलेला संबंध आणि किस्से जोशींनी वर्णिलेले आहेत.

संशोधन कार्यात स्वत:ला पूर्णपणे झोकून देणार्या व्यक्ती दुर्मीळ होत चाललेल्या ह्या काळात श्री. जोशी ह्यांच्यासारख्या माणसांची आगळीवेगळी मुलुखगिरी वेगळी उठून दिसते.

Monday, 20 December 2021

व्यवस्थापन : माणसांचे आणि मुलांचे

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मुख्यालयामध्ये 6व्या मजल्यावर मुंबई पोर्ट ट्रस्टचे ग्रंथालय होते (कदाचित अजूनही ते तेथे असेल). मुंबई पोर्ट ट्रस्टच्या स्पोर्ट्स क्लबची ग्रंथालये वेगळी. कॉन्फरन्स हॉलजवळचे हे ग्रंथालय जरा गंभीर पुस्तकांचे होते. शिपिंग डिप्लोमा करीत असताना अभ्यास करण्यासाठी मला ह्या ग्रंथालयाचा खूप उपयोग झाला. इंडियन शिपिंग, व्हॉएज अकाउंटिंग, कॅरिएज ऑफ गुड्स बाय सी अॅक्ट अशा विषयांवरील पुस्तके व नियतकालिके येथे मिळत.

ह्या ग्रंथालयाचे व्यवस्थापन 'नियोजन व संशोधन' विभागाकडे होते. डॉ. सुब्रतो रे (व्ही शांताराम ह्यांचे जावई) हे या विभागाचे प्रमुख होते आणि वेळोवेळी ते ग्रंथालयात येत असत. आपली अनेक पुस्तकेही त्यांनी ग्रंथालयाला भेट दिली होती. ग्रंथपाल मॅडम माझ्या ओळखीच्या झाल्या होत्या आणि त्या मला ती पुस्तके आवर्जून दाखवत.

Great Ideas in Management हे C N Parkinson, M K Rustomji आणि 9788170943402-usS.A. Sapre या लेखकांचे पुस्तक मला इथेच मिळाले. पार्किन्सन ह्यांच्यासारख्या ख्यातनाम आंतरराष्ट्रीय तज्ञासोबत भारतीय सहलेखक पाहून मला बरे वाटले.

नंतर एकदा जे. जे. हॉस्पिटलजवळ नॅशनल बुक ट्रस्टच्या भांडारात गेलो होतो तिथे स. आ. सप्रे ह्यांचे ''आपले काम, आपले जीवनसर्वस्व'' हे पुस्तक दिसले आणि तिस-या सहलेखकाचे पुस्तक आणि तेही मराठीतून सापडल्याचा आनंद झाला. पुस्तक अतिशय प्रेरणादायक वाटले. नेहमीच्या motivating book सारखे अजिबात नाही. अलंकारिक वगैरे तर नाहीच. काम करा, भरपूर काम करा, दुसरा मार्ग नाही काम करा असे सारखे लिहिले आहे. तरीही परत परत वाचावेसे वाटले. index

स. आ. सप्रे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुद्रणतज्ञ होते. चर्नीरोड स्टेशनजवळच्या शासकीय मुद्रणालयाचे ते संचालक होते. आयुष्याच्या संध्याकाळी वास्तव्यासाठी ते दहिसरला आले. त्यांचे मला एक पत्र आले आणि त्यात त्यांनी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाला काही पुस्तके देणगी देण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यांच्या घरी गेलो असता एका प्रचंड रेकॉर्डरूममध्ये गेल्याचा भास झाला. दाटीवाटीने ठेवलेल्या स्लॉटेड अँगल्सच्या रॅक्सवर पुस्तके खच्चून भरलेली होती. अलिबाबाची गुहा! पुढेपुढे ते संध्याकाळी दहिसर रेल्वे स्टेशनवर येऊन बसत तेव्हा त्यांच्याशी गप्पा मारण्यास मी जात असे.

नंतर यथावकाश दुस-या सहलेखकाचे 'Children: How to Manage Them Now that You've Got Them' (C. Northcote Parkinson ; M.K. Rustomji ; S. Pavri) मजेशीर पुस्तक हाती लागले. आता झालीयत ना मुलं, मग त्यांwpid-20131030_163334ना सांभाळायचं कसं? खरंतर ह्या छोटेखानी पुस्तकात मजकूर असा कमीच आहे. मुख्य आहेत ती मारिओ मिरांडा ह्यांची चित्रं. अप्रतिम आहेत. इंग्रजी सायंदैनिकांचा तो जमाना होता आणि मारिओ ह्यांच्या अनोख्या शैलीतील चित्रांचा खूपच प्रभाव होता. आज ही चित्रे पाहताना आपण अधिकच अचंबित होतो. हे आता हरवले आहे अशी हुरहुरही वाटते.

बालसंगोपनाचा विषय निघाल्यावर मला आणखी एक छान पुस्तक आठवतंय. बालसंगोपन ह्या विषयावरील पुस्तकांना काही तोटा नाही. एकूणच सेल्फ हेल्प बुक्स खंडीभर मिळतील. पण तरीही माझ्या आवडीची पुस्तकं होती फ्लॅश बुक्स सीरीजमधली. THE POCKET LIBRARY OF MODERN LIVING म्हणून ती युरपमध्ये प्रकाशित होत असत. CONTRACT BRIDGE, CHESS, सौंदर्यप्रसाधन, अशा अनेकविध विषयांवर लिहिलेली ती पुस्तके होती. खरंच देखणी पॉकेट बुक्स होती 4.5'' x 4.5'' अशा छोट्या आकाराची. लिश्टनस्टाइनमध्ये छापलेली आणि बेल्जियममध्ये प्रकाशित होणारी. हल्ली दुर्मीळ झालेली आहेत. रद्दीच्या दुकानात जर मिळाली तर सोडू नका, अवश्य खरेदी करा. WhatsApp Image 2021-12-20 at 23.04.22

ह्याच फ्लॅश मालिकेतलं एक पुस्तक आहे 'ब्रिन्गिन्ग अप युवर चिल्ड्रेन' . छोट्या आकाराच्या दीडशे पानांमध्ये आवश्यक आणि उपयुक्त अशी प्राथमिक माहिती ओघवत्या भाषेत मांडलेली आहे. माहिती कितीही दिलेली असली तरी कमीच वाटते. पण छोटेखानी फ्लॅश बुक्सचं वैशिष्ट्य असं ती वाचल्यावर आपल्याला बरीच माहिती झाली असं WhatsApp Image 2021-12-20 at 23.05.49समाधान मिळतं. पुस्तकावर संपादकीय संस्कार अतिशय सफाईनं केलेले दिसतील.

अनेक चांगल्या गोष्टी लुप्त होत जातायत. फ्लॅश बुक्सचं कालौघात लुप्त होणं आणि आपलं हळहळणं असंच एक भाबडं दुःख.

Tuesday, 14 September 2021

अभिनयाची तंत्रे

काल अनिकेत विश्वासराव ह्याची विक्रम गोखले ह्यांनी घेतलेली मुलाखत1 कुतूहल म्हणून पाहिली. विक्रम गोखले ह्यांना मुलाखत देताना  अनिकेतवर दबाव आलेला दिसत होता. आपले वडील श्री. शेखर विश्वासराव ह्यांची पार्श्वभूमी अनिकेतने सांगणे अपेक्षित होते; ती तशी त्याने सांगितली. श्री. शेखर विश्वासराव ह्यांनी दिग्दर्शित केलेल्या दोन नाटुकल्यांमध्ये काम करण्याची संधी मला शालेय जीवनात मिळालेली आहे. तालमीच्या वेळी शिस्त पाळण्याविषयी त्यांचा कटाक्ष असे.

543703887.0.m.1विक्रम गोखले ह्यांनी चरित्रकार म्हणून विशेष प्रसिद्ध असलेल्या रोनाल्ड हेमन2 ह्या ब्रिटिश नाटककार आणि समी़क्षकाच्या एका पुस्तकाचा उल्लेख केला. 'टेकनिक्स अव अॅक्टिंग' हे त्याचे नाव. रोनाल्ड हेमनने लिहिलेली चरित्रे मी वाचलेली नाहीत पण त्याने केलेले समीक्षात्मक लेखन वाचलेले आहे. त्यामुळे रोनाल्ड हेमन हे नाव ऐकल्यावर मी कान टवकारले. 41LgD7YPMuL._SX331_BO1,204,203,200_'हाउ टू रीड अ प्ले' असेही त्याचे एक गाजलेले पुस्तक आहे.

अभिनयाची तंत्रे शिकण्यासाठी तशी स्तानिस्लावस्कीची3 चार पुस्तके आहेत. पण  पुस्तके वाचून अभिनय थोडाच शिकता येतो?

Stanislavsky प्रणाली4 म्हणजे काय हे थोडक्यात जाणून घेण्यासाठी हे संकेतस्थळ पाहावे. `अभिनय’ ह्या विषयावरील मराठी विश्वकोशातील नोंदही5 लक्षणीय आहे.

संदर्भ :

1. https://www.youtube.com/watch?v=oCe0dFKjMXU

2. https://en.wikipedia.org/wiki/Ronald_Hayman

3. https://en.wikipedia.org/wiki/Konstantin_Stanislavski 

4. https://mr.eferrit.com/stanislavsky-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80/

5. https://vishwakosh.marathi.gov.in/26240/