StatCounter

Friday 1 January 2021

गीताचिकित्सा

'' चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः....'' ह्या गीतेतल्या तिसर्या अध्यायातील श्लोकापासून गीतेतील प्रतिपाद्य विषयांच्या संगतीबाबत माझा गोंधळ सुरू होतो. गीतेतील श्लोकांची संगती ह्या विषयाचीही चर्चा सहज कुठेही आढळत नाही. माझ्या आठवणीनुसार हा विषय माझ्या वाचनात प्रथम आला तो `विनोबा सारस्वत' ह्या पुस्तकातील विनोबांच्या लेखामध्ये. प्रा. राम शेवाळकर ह्यांनी साहित्य अकादमीसाठी संकलित केलेल्या विनोबांच्या निवडक साहित्यात हा लेख अंतर्भूत केलेला आहे.

त्यानंतर ह्या विषयाशी पुन्हा ओळख 2017 साली झाली. आम्ही उरळीकांचन येथील निसर्गोपचार आश्रमात राहिलो होतो. त्यावेळी तेथील ग्रंथभांडारातून श्री. भाऊ धर्माधिकारी ह्यांचा `गीताचिकित्सा' हा ग्रंथ घेऊन वाचला आणि गीतेतील श्लोकांच्या संगतीचा विषय पुन्हा डोळ्यांखालून गेला. प्राज्ञपाठशाळा मंडळ, वाई, ह्यांनी 1992 साली प्रकाशित केलेल्या ह्या ग्रंथाला मे. पु. रेगे ह्यांची विवेचक प्रस्तावना आहे. भाऊ धर्माधिकारी ह्यांचा पिंडच `आध्यात्मिक आणि चिंतनशील' आहे आणि संपूर्ण भगवद्गीता त्यांना मुखोद्गतही आहे तसेच गीतेवर भाष्य करण्यासाठी ते निःसंशय अधिकारी व्यक्ती आहेत अशी माहिती ह्या प्रस्तावनेत मिळते.

गीतेचा सखोल अभ्यास सादर करताना गीता ही महाभारतामध्ये प्रक्षिप्त कशी आहे, अनेक पुनरुक्त / विसंगत प्रतिपादने असलेली गीता ही एका व्यक्तीने केलेली रचना नसून 11 विभिन्न तत्त्वचिंतकांनी केलेल्या प्रतिपादनांचे हे संकलन आहे असे त्यांनी तर्कशुद्ध मांडणीतूgeetachikistaa-frontन सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

ज्ञानेश्वर, शंकराचार्य, विनोबा, टिळक, गांधीजी वगैरे गीताभाष्यकारांची कुठे कशी अडचण झाली आहे व त्यावर त्यांनी कसा मार्ग काढला आहे ह्याचेही दिग्दर्शन ह्या पुस्तकात पदोपदी आढळते. श्रद्धेला धक्का न लागेल अशा बेताने भाष्यकारांनी ह्या तडजोडी केल्याचे सांगतानाच प्रत्यक्ष श्रद्धा म्हणजे काय ह्याचाही सुंदर ऊहापोह लेखकाने केलेला आहे.

हा ग्रंथ वाचल्यावर पुन्हा गीता वाचताना वेगळ्या दृष्टीने प्रतिपाद्य विषयाकडे न पाहणे केवळ अशक्य आहे. गीतेकडे अधिक डोळसपणे `ती जशी आहे तशी' पाहता येणे सुलभ होईल असे वाटले. ग्रंथ टीकात्मक असला तरी गीतेचा अनादर होईल असे काहीही त्यात नाही हे विशेष होय.

आपले मत ठसविण्यासाठी विवेचनाच्या ओघात ह्या ग्रंथात अनेकदा पुनरुक्ति झालेली जाणवते पण एका प्रकारे ती क्षम्यही आहे. ग्रंथ वाचून झाल्यावर गीतेतील कल्पनाविस्तार आणि व्यत्यास शोधून काढणार्या लेखकाच्या मर्मग्राही अभ्यासदृष्टीचा प्रभाव मनावर जाणवत राहतो.

श्री. नागेश वासुदेव गुणाजी ह्यांनी भाषांतरित केलेली सार्थ श्रीमद्भवद्गीता केशव भिकाजी ढवळे प्रकाशनाने प्रकाशित केलेली आहे. पुस्तकाला असलेली भाषांतरकाराची प्रस्तावना वाचत असताना गीताचिकित्सा ह्या ग्रंथाची पुन्हा आठवण झाली. गीतेची मुख्य शिकवण ह्या शीर्षकाखाली प्रस्तावनेत नित्य'युक्त' आणि भक्त ह्यांच्यातील अभिन्नत्व गीतेत प्रतिपादित केले आहे असा विचार मांडलेला दिसतो.

गीताचिकित्सा ह्या ग्रंथाचे परीक्षण विद्वानांनी कसे केले आहे ह्याचा काहीसा शोध घेतला तेव्हा सुरेन्द्र बारलिंगे ह्यांनी 'परामर्श' त्रैमासिकासाठी केलेले 10 पानी परीक्षण सापडले.

परीक्षणाच्या अखेरीस त्यांनी गांधीजींचे ह्याबाबतचे (बारलिंगे ह्यांना न पटणारे) विचार दिलेले आहेत. (मला मात्र ते पटले, असो.)

गांधीजी लिहितात, ''सन 1888-89 मध्ये गीतेचे प्रथम दर्शन झाले तेव्हाच मला वाटले की हा ऐतिहासिक ग्रंथ नाही तर त्यात भौतिक युद्धाच्या वर्णनाच्या निमित्ताने प्रत्येक मनुष्याच्या हृदयात निरंतर चाललेल्या द्वंद्व-युद्धाचेच वर्णन आहे. मानुषी योद्ध्यांची रचना हृदयगत युद्धाला रसिक बनविण्यासाठी उभी केलेली कल्पना आहे. ही प्राथमिक स्फुरणा धर्माचा आणि गीतेचा विशेष विचार केल्यानंतर पक्की झाली… महाभारत हा ग्रंथ मी आधुनिक अर्थाने इतिहास मानत नाही.''

आनुषंगिक लाभ : गीताचिकित्सेच्या परीक्षणाचा शोध घेताना दोन गोष्टी सापडल्या -

1. 'परामर्श' ह्या पुणे विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभागाच्या त्रैमासिकाचे गेल्या 27 वर्षांचे अंक.

http://unipune.ac.in/snc/cssh/ipq/ParamarshMarathi/Cover03.html

2. भाऊ धर्माधिकारी ह्यांनी संपादिलेला मराठी-गुजराती शब्दकोश. ह्या कोशात मराठी शब्दांचे अर्थ गुजरातीमध्ये (पण देवनागरी लिपीमध्ये) दिलेले आहेत.

https://epustakalay.com/book/185804-marathi-gujrati-shabdkosh-by-bhau-dharmadhikari/

No comments:

Post a Comment