हेमंत प्रकाश राजोपाध्ये हे जर्मनीतील ग्योटिंगेन विद्यापीठात पीएच. डी. संशोधक असून, ऑब्झव्र्हर रीसर्च फाऊंडेशन, मुंबई येथे वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहेत. दैनिक लोकसत्तामध्ये जानेवारी 2018 पासून दुस-या आणि चौथ्या रविवारी धारणांचे धागे हे सदर ते लिहीत आहेत. भारतीय प्राज्ञिक इतिहासाच्या शोधात असताना मी सहाजिकच त्यांच्या लेखनाकडे वळलो. इतिहासाची त्यांनी केलेली मांडणी पोस्ट मॉडर्नच्याही नंतरच्या म्हणजे मेटामॉडर्न दृष्टिकोनातून१ केलेली आहे. सोप्या भाषेत असलेले हे लेखन पुन्हा पुन्हा वाचल्याशिवाय पूर्णपणे समजत नाही असा अनुभव मला आला. पण समजल्यानंतर मात्र कसदार लेखन वाचल्याचा आनंद मिळतो. त्यांचे लेखन ह्या दुव्यावर सापडू शकेल.
लेखमालेचे स्वरूप पहिल्या लेखात सांगताना ते म्हणतात,
``या मोठय़ा पटाकडे पाहताना या पूर्ण वर्षांत आपण ऋग्वेदादी वैदिक संहिता, कर्मकांडप्रधान ब्राह्मणग्रंथ, आरण्यके, उपनिषदे, बौद्ध-जैन परंपरांतील प्रारंभिक प्रवाह, षड्दर्शने, स्मृती-सूत्रसाहित्य, धर्मशास्त्रांतर्गत स्मृती-सूत्र साहित्य, आर्षमहाकाव्ये, पुराणे, ऐतिहासिक भूगोल (Historical geography), धार्मिक भूगोल (sacred geography), मध्ययुगीन तत्त्वज्ञान-धर्मप्रवाह, मध्यपूर्वेतून झालेला इस्लामी शासकांचा प्रवेश, भक्ती संप्रदाय, वैदिक-पुनरुज्जीवनवादी चळवळी, उत्तर-मध्ययुगातील शिवकाळ-पेशवाई-टिपू वगैरे राजसत्ता आणि वर चर्चा केली त्याप्रमाणे वसाहतवादी व वसाहतोत्तरकालीन इतिहास असा विस्तृत पट पाहायचा आहे.''
ह्या विषयाची हाताळणी कशी केली आहे त्याचा उल्लेख त्यांनी पुन्हा आपल्या 1 जून 2018 च्या लेखामध्ये केला आहे.
``मानवी इतिहास-संस्कृती आणि सामाजिकतेविषयीच्या सिद्धांतनासंबंधीच्या अद्ययतन अशा बहुविद्याशाखीय, विविध चिकित्सात्मक परंपरा आणि पद्धतींच्या आधारे आपल्याला उपखंडाचा इतिहास जोखायचा आहे, हे आपण ठरवलं होतं.''
राजोपाध्यांची मांडणी अशा त-हेची बहुविद्याशाखीय, समावेशक असल्याने प्राज्ञिक इतिहासाच्या मांडणीच्या जवळ जाणारी आहे असे वाटले. त्यांचे सदर आपल्या सर्वांप्रमाणे मीही वाचीत होतो पण आता हे सर्व लेख पुन्हा वाचल्यानंतर त्या लेखनाचे महत्त्व आणि वेगळेपण प्रकर्षाने जाणवले.
१(मेटामॉडर्न दृष्टिकोनातून जागतिक पातळीवर कसा विचार सुरू आहे ह्याचा मासला हेन्झी फ़्रिनाख्त यांच्या ह्या दुव्यावरील लेखात मिळेल)
No comments:
Post a Comment