StatCounter

Friday, 3 February 2023

रवींद्रायन

स्थळवर्णन आणि व्यक्तिचित्रण करण्यात हातखंडा असलेल्या रवींद्र पिंगे (1926-2008) ह्यांच्या पश्चात त्यांच्या मुलाने प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या संकीर्ण ललित लेखांचा रवीन्द्रायन हा संग्रह आहे.

पिंगे अर्थशास्त्राचे पदवीधर होते. त्यांचे बालपण मुंबईत गिरगावात गेले.  पिंगे कुटुंब मूळचे विजयदुर्गाच्या जवळ असलेल्या `उपळे’ ह्या गावचे. संग्रहातले उपळे आणि कोकणातील इतर गावांचे मनोज्ञ वर्णन करणारे लेख विशेष वाचनीय आहेत. 319-pinge-ravindra-ramchandra_1

 

 

लेखक आणि लेखनाविषयीचे ह्या पुस्तकातील लेख सुद्धा वाचकांना नक्की आवडतील. ‘'मजकूर आशयसंपन्न असावा, आविष्कारशैली प्रवाही असावी, मजकुराची कागदावरील मांडणी नेत्रसुखद असावी, पुस्तकाचा बोलबाला व्हावा, गुंतवलेलं धन विक्रीतून चालीचालीनं वसूल व्हावं…’’ अशा लेखकाच्या माफक अपेक्षा त्यांनी सांगितलेल्या आहेत.

व्यक्तिचित्रणांमध्ये, अभिजात लेखन करणार्या हेन्री डेव्हिड थोरो ते इंदिरा संत ह्यांच्यापर्यंतच्या प्रसिद्ध आणि धुरंधर लेखकांची व्यक्तिचित्रे आहेत. स्थळवर्णन ऐतिहासिक तसेच निसर्गरम्य स्थळांचे आहे.

कोकणातील निसर्गाचे आणि खाद्यपदार्थांच्या चवीचे वर्णन करताना पिंग्यांची लेखणी विशेष बहरते. ‘पापलेट, सरंगे, कोळंबी, सुरमई, बांगडे, कान्टा, बोयटं, कर्ली, कालवं’ अशी सागरी मासळी त्यांना साद घालते. तांबड्या झाकेचा भात, कुळथाची पिठी, पडवळाची, किंवा दोडक्याची किंवा पाल्याची भाजी आणि फोडणीचं ताक हे अन्नब्रह्म…’’b81dfae8589040f6ac9725825a5c7ca3

 

पिंगे यांनी मंत्रालयात पंधरा वर्षे नोकरी केल्यानंतर १९६५मध्ये ते आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात साहाय्यक निर्माता म्हणून रुजू झाले. त्यानंतर आकाशवाणीसाठी त्यांनी डझनावारी नाटिका लिहिल्या. ‘बकुल फुल’, ‘शतपावली’ (१९७४), ‘देवाघरचा पाऊस’ (१९७५), ‘दिवे लक्ष्मण दिवे’ (१९८४), ‘अत्तर आणि गुलाबपाणी’  (१९९६) हे लेखसंग्रह; ‘आनंदाच्या दाही दिशा’ (१९७४), ‘आनंदव्रत’ (१९८३), ‘दुसरी पौर्णिमा’ (१९९६) ही प्रवासवर्णने; ‘पश्चिमेचा पुत्र’ (१९७२), ‘पिंपळपान’ (१९८६), ‘हिरवीगार पानं’ (१९९२) ही पाश्‍चात्त्य साहित्याचा परिचय करून देणारी पुस्तके; ‘परशुरामाची सावली’ (१९७०) ही कादंबरी; ‘प्राजक्ताची फांदी’ (१९७८), व ‘सुखाचं फूल’ (१९८१) हे कथासंग्रह; असे विविध स्वरूपाचे लेखन पिंगे यांनी केले. विशेष म्हणजे त्यांचे सुमारे दोनशे ललितलेख ‘माणूस’ साप्ताहिकातून सतत पाच वर्षांच्या प्रसिद्ध कालावधीत झाले. ‘साहित्यसूची’चे ते लेखक आणि संपादकीय सल्लागार होते. ‘सर्वोत्तम रवींद्र पिंगे’, तीनशे भारतीयांची व्यक्तिचित्रे, पाश्चात्त्य साहित्यसेवकांचे दोनशे परिचय, शंभर प्रवासवर्णने, हजारो पुस्तक परीक्षणे, साठ मानपत्रे, पाच-सहाशे ललितलेख, पन्नास कथा आणि तितकेच अनुवाद ही पिंगे यांची लेखनसंपत्ती होय. पिंगे यांच्या लेखनाला वाचकांनी भरभरून प्रेम दिले, दाद दिली.(

https://maharashtranayak.in/paingae-ravaindara-raamacandara )

 

इतिशोध

पद्मगंधा प्रकाशनातर्फे सुमारे 25 वर्षांपूर्वी प्रकाशित करण्यात आलेले 'इतिशोध' हे इतिहास संशोधक सुरेश जोशी ह्यांचे 172 पानांचे पुस्तक नुकतेच वाचनात आले. लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांचे हे संकलन आहे.

पुस्तकाच्या प्रस्तावनेत श्री. निनाद बेडेकर म्हणतात, '' इतिशोध हे आत्मचरित्र नव्हे. ऐतिहासिक साधने गोळा करण्यासाठी केलेल्या कष्टमेहनतीची ती एक गाथा आहे, किंवा व्यथा आहे.'' शिलालेख, ताम्रपट, मूर्ती, चित्रे, नाणी, खापरे, कागदपत्रे अशीच इतिहास संशोधनाची साधने असतात. ऐतिहासिक साधने संगृहीत करून ठेवण्यास मिळालेली दृष्टी हे खरे तर ह्या मेहनतीमागचे भांडवल आहे.

श्री. सुरेश जोशी 40 वर्षे अहमदनगर ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाचे कार्यकारी विश्वस्त होते. पुण्यातील राजा केळकर वस्तुसंग्रहालयाचे क्युरेटर म्हणूनही काही काळ त्यांनी काम पाहिले आहे.

नगरच्या ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयातील दुर्मीळ, साधनांचा प्रचंड संग्रह त्यांच्या परिश्रमाची, चिकाटीची आणि जिद्दीची साक्ष आहे. हा बहुमोल संग्रह गोळा करताना अनेक व्यक्ती, समाज आणि प्रसंग ह्यांचा श्री. जोशी ह्यांच्या संवेदनशील मनाने घेतलेला शोध असे ह्या 'इतिशोधाचे' स्वरूप आहे.WhatsApp Image 2023-01-28 at 12.08.03

महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार ह्यांचा सहवास आणि मार्गदर्शन आणि त्यांच्याशी असलेला घरोबा ह्याविषयी जोशी ह्यांनी समरसून लिहिले आहे. सेतुमाधवराव पगडी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, डॉ. सांकलिया, डॉ. पु. म. जोशी, प्रा. राम शेवाळकर, न. र. फाटक, बाबासाहेब पुरंदरे, अशा अनेक दिग्गजांशी आलेला संबंध आणि किस्से जोशींनी वर्णिलेले आहेत.

संशोधन कार्यात स्वत:ला पूर्णपणे झोकून देणार्या व्यक्ती दुर्मीळ होत चाललेल्या ह्या काळात श्री. जोशी ह्यांच्यासारख्या माणसांची आगळीवेगळी मुलुखगिरी वेगळी उठून दिसते.