StatCounter

Wednesday, 16 June 2021

वेरुळ आणि ज्ञानदृष्टी

लोकराज्य(१) हे महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणारे मासिक केवळ शासकीय स्पर्धा परी़क्षांच्या विद्यार्थ्यांनाच उपयुक्त असते असे नाही. लोकराज्यचे विशेषांक मान्यवरांच्या लेखनाने सजलेले असतात आणि संग्राह्य असतात. मासिकाच्या संकेतस्थळावर किंवा इंटरनेटवर इतरत्र अथवा ग्रंथालयांमधून ह्या अंकांचे नीट जतन करण्याचे काम कोणीतरी तडीस नेईल अशी आशा करूया.

लोकराज्यच्या नोव्हेंबर २०११ च्या अंकात  पुण्यभूषण डॉ. गो. बं. देगलूरकर एम.ए. (इण्डॉलॉजी)(२) ह्यांचा एक सुंदर लेख आलेला आहे. हा अंक चित्र-शिल्प विशेषांक आहे. लेखाच्या पहिल्या परिच्छेदात त्यांनी उत्तम शिल्पकलेमागचे तत्त्वज्ञान स्पष्ट केले आहे. देगलूरकरांचे मूर्तिशास्त्रातील विद्यार्थी श्री. उदयन इंदूरकर ह्यांनी ह्या तत्त्वज्ञानाच्या आधारे लिहिलेली 'अद्भुत शिल्प; वेरुळ' ही 56 पृष्ठांची पुस्तिका आमच्या शेजारी राहणा-या ऋचा राऊत ह्यांनी वाचायला दिली. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये त्या प्राध्यापिका आहेत. ह्या पुस्तकाच्या वाचनाने आगळावेगळा आनंद दिला.

वेरुळची लेणी मी पाहिली आहेत. पण अशा ठिकाणी आपला मार्गदर्शक ज्या वकूबाचा असतो आणि आपल्यापाशी जो काही वेळ असतो त्यावर, किंबहुना पाहणारा कोण आहे यावर अशा सौंदर्यानुभवाची प्रत अवलंबून असते.

श्री. उदयन इंदूरकर ह्यांची दृष्टी ह्या विषयातील तज्ज्ञाची तर आहेच शिवाय ती ज्ञानेश्वरीच्या आणि संतवा‌ङ्मयाच्या आध्यात्मिक सत्संगातून सिद्ध झालेली आहे. शिल्पसौंदर्य नेमकेपणाने पाहण्याची, विराट शिल्पकृतीच्या निर्मितीतील कलाकाराची प्रतिभा हेरण्याची ही दृष्टी आहे. ही दृष्टी दिल्याबद्दल इंदूरकर आपल्या गुरुंविषयी कृतज्ञता व्यक्त करतात, ती ह्या दोन ओव्यांमधून-

गुरु स्नेहाचिये दृष्टी । मी पृथ्वी होईन तळवटीं ।

ऐसिया मनोरथांच्या सृष्टी । अनंता रची ।। 414 ज्ञा - 13

तैसा गुरुकुळाचेनि नावें । महासुखे अति थोरावे ।

जे कोडेंही पोटाळावें । आकाश कां ।। 383 ज्ञा - 13

इंदूरकर पुढे म्हणतात की ज्ञानेश्वरीतील शिल्पशास्त्रविषयक संदर्भ सरांनीच शोधले आणि पुढे अधिक शोधण्याची प्रेरणाही त्यांनीच दिली. ह्या अभ्यासयात्रेतील अनुभवाचे वर्णन करण्यासाठीही ते ज्ञानेश्वरीचा आधार घेतात -

नातरी रंके निधान देखिलें । का आंधळिया डोळे उघडले ।

भणंगाचिया आंगा आले । इंद्रपद ।। 382 ज्ञा - 13

भारतीय वास्तू आणि शिल्प ह्यांचे वेगळेपण सांगताना इंदूरकर म्हणतात, ''हिंदू धर्म, तत्त्वज्ञान आणि संस्कृती कलेच्या माध्यमातून पोहोचविण्याचे असाधारण कार्य सहस्रावधी वर्षे नृत्य, नाट्य, संगीत, चित्रकला इ. माध्यमांमधून सुरू होते. शिल्पकारांनी ह्याचा कळस केला. `शब्देवीण संवादिजे' ह्या पद्धतीने दगडात शिल्पे कोरून हे विचारधन त्यांनी शाश्वत केले.

पुण्यभूषण पुरस्कार मिळाला त्यावेळी दिलेल्या एका मुलाखतीत(३)(४) डॉ. गो. बं. देगलूरकर म्हणतात, "… मंदिर स्थापत्य व मूर्ती हाताळताना केवळ तेवढे पाहणेच पुरेसे नसते. या दोन्ही गोष्टी जेव्हा प्रगत होत गेल्या, तेव्हा त्यामागे असणारा सांस्कृतिक ठेवाही लक्षात घ्यायला माझ्या पार्श्वभूमीची मदत झाली. उदाहरणार्थ, एखादी मूर्ती साकार होताना ती मूर्ती भक्तांना व तेव्हाच्या समाजाला ज्या गुणांची आवश्यकता आहे ते गुण साकारते. कारण मूर्तिपूजा म्हणजे केवळ मूर्तिपूजा नसून, ती गुणांची, तसेच त्यामागच्या तत्त्वज्ञानाची पूजा असते…"

पुस्तिकेमध्ये वेरुळच्या दशावतार, रामेश्वर आणि कैलास ह्या तीन प्रमुख हिंदू लेण्यांचा परामर्श घेतलेला आहे व ह्या शिल्पांमधील संकल्पना विविध सुभाषितांच्या व ओव्यांच्या आधारे स्पष्ट केल्या आहेत.

गजलक्ष्मीच्या शिल्पाविषयी लिहिताना इंदूरकर `लक्ष्मी' ही संकल्पना स्पष्ट करून सांगतात. लक्ष्मी हे परिपूर्ण असे निसर्गाचे वैभव म्हणजे सृष्टीच्या समृद्धीचे चिह्न आहे, लक्ष्मी म्हणजे केवळ धनसंपदा नव्हे.

का कमलकंदा आणि दुर्दरीं । नांदणूक एकेचि घरीं ।

परि परागु सेविजे भ्रमरीं । येरां चिखलुचि उरे ।।58।। ज्ञाने - 09

कामदेव-रतिचे शिल्प कितीही मधुर, मीलनाचे व्यक्तिकरण असले तरी तो विषयरूप मगरीचाच जबडा आहे.

एकीं वयसेचें जाड बांधलें । मग मन्मथाचिये कासे लागले ।

ते विषयमगरी सांडिले । चघळूनियां ।।85।। ज्ञाने - 07

सरिता मंदिर ह्या भव्य शिल्पामध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती ह्या तिन्हीं नद्यांचे शिल्पांकन केले आहे. प्रयागचा हा संगम महाराष्ट्रात साकार केला आहे. तिन्ही नद्यांच्या मूर्ति त्रिभंगात असून स्वभाव विशेषानुसार त्या कशा वेगवेगळ्या घडविल्या आहेत ह्याचे मनोज्ञ रसग्रहण पुस्तकात आहे.

मीनले गंगे यमुनेचे ओघ । तैसें रसां जाहलें प्रयाग ।

म्हणोनि सुस्नात होय जग । आघवें येथ ।।6।।

माजीं गीता सरस्वती गुप्त । आणि दोनी रस ते ओघ मूर्त ।

यालागीं त्रिवेणी हे उचित । फावली बापा ।।7।। ज्ञाने - 11

असे गूढगुंजन करणार्या समर्पक ओव्या लेखाने उद्धृत केल्या आहेत.

अवकाश आणि काळ एकमेकांमध्ये कसे मिसळलेले असतात हे सांगणारे `शेषशायी अनंत' ह्या काळाच्या शिल्पाचे वर्णन असून त्या अनुषंगाने केलेले सगळेच तत्त्वज्ञानपर विवेचन वेधक आहे. 'अहमेवक्षयः कालो' (गी - 10-33) ह्या संकल्पनेचे निःशब्द निरूपण करणारे हे शिल्प आहे.

जो प्रळयतेजा देत मिठी । सगळिया पवनाते गिळी किरीटी ।

आकाश जयाचिया पोटी । सामावले ।।272।। ज्ञाने - 10

ऐसा अपार जो काळु । तो मी म्हणे लक्ष्मीलीळु ।

मग पुढती सृष्टीचा मेळु । सृजिता तो मी ।। 273 ।। ज्ञाने - 10

येथे लक्ष्मीलीळु ह्या विशेषणासंबंधाने लेखकाने केलेले विवेचन विशेष वाचनीय आहे.

पुस्तिकेत शिल्पांची छायाचित्रे तर आहेतच पण अनेक शिल्पांचे रसग्रहण करताना गुरुकृपेने ज्ञानपूत अशा दृष्टीचा प्रत्यय लेखकाने दिलेला आहे. त्याचे थोडक्यात वर्णन वर केले आहे. ही पुस्तिका केवळ 56 पानांची असली तरी तिच्यातील अनेक चिंतनस्थळे आणि शब्दशिल्पे अरूपाचे रूप दाखविणारी आहेत. पदोपदी थांबून मागे वळत वळत, वाचक ह्या लेखनाचा आनंद घेत राहतो.

डॉ. गो .बं. देगलूरकर यांनी भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेमध्ये दि. १९/१२/२०१८ रोजी दिलेले ’कैलास लेणे एक अदभूत शिल्प’ ह्या विषयावरील व्याख्यान इंटरनेटवर उपलब्ध आहे.(५) वेळात वेळ काढून ते ऐकावे असे आहे.

संदर्भ :

(१) https://dgipr.maharashtra.gov.in/lokrajya-marathi

(२) https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B.%E0%A4%AC%E0%A4%82._%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0

(३) डॉ. गो .बं. देगलूरकर ह्यांच्या मुलाखतीचा वृत्तांत - https://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=5207579624637229517&title=Interview%20of%20Dr.%20G.%20B.%20Deglurkar&SectionId=1002&SectionName=Be%20Positive&TagName=Vivek%20Sabnis&NewsTagId=5408018058250405668&BM=False&FW=False&ITG=False

(४) डॉ. गो .बं. देगलूरकर ह्यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ - https://www.youtube.com/watch?v=bQ0sRCU2ud0

(५) डॉ. गो .बं. देगलूरकर यांच्या व्याख्यानाचा दुवा - https://www.youtube.com/watch?v=CnK8Jpd5o0Y

(६) मिसळपाव ह्या संकेतस्थळावरील वेरुळविषयक लेख आणि छायाचित्रे - https://www.misalpav.com/node/30895

15b673ca-1c45-4680-89d9-d0100dee37faa1c0ba9d-dd3f-48ab-a210-fa16a9f66849