एका इतिहासप्रेमी व्हॉट्सअप समूहावर 'ज्ञानेश्वरीत विज्ञान आहे का', किंवा ज्ञानेश्वर वैज्ञानिक होते का अशा स्वरूपाची चर्चा सुरू आहे. खरंतर ज्ञानेश्वरी हा ऐतिहासिक दस्तऐवज आहे का, किंवा ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून त्या ग्रंथाची ग्राह्यता किती असे प्रश्नाचे स्वरूप आहे. ज्ञानेश्वर एक की दोन की अनेक, ज्ञानेश्वरीत प्रक्षिप्त भाग किती? निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई ह्या ऐतिहासिक व्यक्ती होत्या की ही 'विठ्ठल'पंतांची मुले म्हणजे एक रूपक आहे वगैरे अनेक प्रश्न वस्तुनिष्ठ म्हणून विचारता येतील. अशा प्रश्नांचा उपहास न करता प्रभावी प्रतिवाद करायचा तर राजीव मल्होत्रा ह्यांच्या म्हणण्यानुसार `इंटलेक्च्युअल क्षत्रियां'ची गरज आजच्या घडीला आहे.
ज्ञानेश्वरांच्या काळी विबुध जनमानसात कोणत्या विज्ञानविषयक कल्पना रूढ होत्या ते पहावे असा विचार करून भारतातील बुद्धिगम्य ज्ञानाचा इतिहास एखाद्या पुस्तकात सापडतो का हे पहावे असे वाटले. केवळ ज्ञानेश्वरकालीन नाही तर Intellectual History of India असे काही लेखन शक्यतो भारतीयांनी केले असल्यास ते वाचण्याची उत्सुकता मला आहे. पीटर वॅटसन ह्यांचे 'द मॉडर्न माईंड, अॅन इंटलेक्च्युअल हिस्ट्री अव ट्वेंटिएथ सेंच्युरी' हे पुस्तक जसे आहे (फार बाळबोध किंवा थिल्लर नको आणि अति बोजडही नको) तसे लेखन भारताबाबत असल्यास ते वाचावे अशी माझी इच्छा आहे.
वरील खोडसाळ प्रश्न वादासाठी मी येथे उपस्थित केलेले असले तरी पूर्वी काही जणांनी ते उपस्थित करून झाले आहेत. ज्ञानेश्वरीतील विज्ञान हे एक निमित्त झाले. हल्ली व्हॉट्सअपवर आपण राजकीय आणि सामाजिक इतिहासांची चर्चा अनेकदा करतो परंतु वैचारिक किंवा प्राज्ञिक इतिहासाच्या परिप्रेक्ष्यातूनही भूतकाळाकडे पाहणे उद्बोधक ठरेल असे वाटते. प्राज्ञिक इतिहासात सम्यक परामर्श घेतला जात असल्याने जर प्राज्ञिक इतिहासाचा वेध घेण्याची पद्धत अधिक रुजली तर खोडसाळ मुद्दे उपस्थित होणे आपोआप कमी होईल असे वाटते. मुद्यांना अनेक अंगांनी भिडणे, आंतरशाखीय विचारव्यूह रचणे प्राज्ञिक इतिहासाच्या कक्षेत येते. रिचर्ड व्हॉटमोअर आणि ब्रायन यंग ह्यांनी संपादित केलेल्या `अ कंपॅनियन टू इंटलेक्च्युअल हिस्ट्री' ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये प्राज्ञिक इतिहासाची चांगली ओळख करून दिलेली आहे.
1960 पासून प्राज्ञिक इतिहास ही केवळ आंग्लभाषक जगतामध्येच नाही तर संपूर्ण यूरपमध्ये ऐतिकासिक व्यवसायातील यशोगाथा ठरली आहे. प्राज्ञिक इतिहासाच्या परिप्रेक्ष्यामधून पाहिला न जाणारा विषय आजकाल सापडणे दुरापास्त आहे. नरभक्षण ( आणि इतरही भोगोपभोग), विज्ञान आणि तंत्रज्ञान, मानवांची आणि प्राण्यांची शरीरे, भावना आणि संवेदना, आणि स्तोत्रे ह्या विषयांवरील प्राज्ञिक इतिहास आहेत. ह्या दृष्टिकोनाच्या यशाचे एक कारण म्हणजे विषयाचे आंतरशाखीय स्वरूप होय. प्राज्ञिक इतिहासकार केवळ विद्यापीठांच्या इतिहास विभागांमधूनच आहेत असे नसून राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, इंग्लिश, भाषा आणि भाषाशास्त्र, अभिजात वाङ्मय, देवत्व, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र, व्यवसाय आणि व्यवस्थापन, लोकप्रशासन, गणित आणि सर्व नैसर्गिक शास्त्रे ह्या विभागांमधूनही आहेत.
प्राज्ञिक इतिहास हा नुसताच राजांचा, राज्यांचा इतिहास नसून कल्पनांचा, विचारांचा आणि संबंधित विचारवंतांचा इतिहास असतो.
व्हॉट्सअप समूहांसारख्या व्यासपीठांवर इतिहासाशी निगडित विषयांवर अनेकांगी चर्चा झाल्यास हे परिप्रेक्ष्य सहजच साधले जाईल असे मला वाटते. तत्कालीन समाजमनांच्या धारणांचा वेध घेणे इतिहासप्रेमींसाठी नक्कीच रोचक आणि आनंददायी ठरेल.